शिवजयंती उत्सव: पुण्यात जल्लोषाचे दृश्य!

शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुण्यात शिवजयंतीनिमित्त मोठा उत्साह आहे. शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे आणि शहरातील नागरिक उत्साहात सामील होत आहेत.

शिवजयंतीचा जल्लोष! पुण्यात उत्सवाची जय्यत तयारी, मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे, १७ मार्च: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (तिथीनुसार) संपूर्ण पुणे शहर आणि उपनगरात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. शहरातील विविध संस्था आणि मंडळांच्या वतीने शिवपूजन, मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात शिवजयंती उत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, संपूर्ण शहर ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणांनी दुमदुमणार आहे.

शहरात ठिकठिकाणी शिवजयंती उत्सवाची तयारी पूर्ण

रविवारी (१६ मार्च) संपूर्ण पुण्यात शिवजयंतीची तयारी अंतिम टप्प्यात होती. उत्सव मंडप उभारणी, भगवे ध्वज, फलक लावण्याचे काम सुरू होते. कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या जोशात तयारी करताना दिसून आले. पुण्यातील महत्त्वाच्या चौकांमध्ये शिवाजी महाराजांचे भव्य होर्डिंग्ज आणि छायाचित्रे झळकत आहेत.

सोमवारी (१७ मार्च) सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती उत्सवाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर शहरातील विविध भागांमध्ये मिरवणुका निघणार आहेत. या मिरवणुकांमध्ये शिवकालीन वेशभूषा परिधान केलेले तरुण, तलवारबाजीचे प्रात्यक्षिक, तसेच नादब्रह्म ढोल ताशा पथकांच्या वादनाने वातावरण शिवमय होणार आहे.

शिव महोत्सव २०२५ – कोथरूडमध्ये खास कार्यक्रम

कोथरूड येथील श्रीमान योगी प्रतिष्ठानच्या वतीने ‘शिव महोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांच्या अस्सल ठशांवरून तयार केलेली चांदीतील प्रतिकृती भाविकांना पाहता येणार आहे.

हा विशेष कार्यक्रम सोमवारी (१७ मार्च) सायंकाळी ६ वाजता कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे होणार आहे. या वेळी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, युवा उद्योजक पुनीत बालन, भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे आणि प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन होणार असून, नादब्रह्म ढोल पथकाचे भव्य वादन रंगणार आहे.

मनसेच्या वतीने शिववंदना कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोंढवा खुर्द येथे नरवीर तानाजी मालुसरे चौकात शिववंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी ७ वाजता पार पडणार आहे. यावेळी पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक साईनाथ बाबर यांनी दिली.

शहरभर मिरवणुकांचे आयोजन

गुरुवार पेठेतील प्रभात मित्रमंडळ यांच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त मिरवणुकीसह शिवआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार पेठेतील कृष्णाहट्टी चौकात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.

तसेच हत्ती गणपती चौकातील शिवोत्सव आयोजन समितीच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. हत्ती गणपती चौकापासून सुरू होणाऱ्या या मिरवणुकीत पारंपरिक वाद्य, घोडेस्वार आणि शिवकालीन सैनिकांची वेषभूषा परिधान केलेले युवक सहभागी होणार आहेत.

शिवजयंतीच्या निमित्ताने शहरात जल्लोषाचे वातावरण

शिवजयंतीनिमित्त पुणे शहरात ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. मिरवणुकीच्या मार्गावर फुलांची सजावट, भगवे ध्वज आणि प्रकाशयोजना केली आहे. याशिवाय, विविध सामाजिक संस्थांच्या वतीने शिवचरित्र कथन, व्याख्याने, रक्तदान शिबिरे आणि सामुदायिक भोजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, मिरवणूक मार्गांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेसाठी पोलिसांनी सीसीटीव्ही नियंत्रण वाढवले आहे.

शिवप्रेमींमध्ये उत्साह, जय भवानी-जय शिवाजीचा गजर!

शिवजयंतीच्या निमित्ताने शहरभर शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून येत आहे. ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणांनी संपूर्ण पुणे शहर शिवमय झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांच्या पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या शिवजयंतीनिमित्त पुणेकर मोठ्या संख्येने सहभागी होत असून, शहरभर शिवरायांचे गगनभेदी घोष पुकारले जाणार आहेत!
 

Review