
सूरजच्या अकाऊंटवरून अंकिताचे फोटो डिलीट झाले! चाहते नाराज; कोकण हार्टेड गर्ल म्हणाली, “यातून काढता पाय…”
बिग बॉस मराठी: सूरजच्या अकाऊंटवरून अंकिताबरोबरचे फोटो डिलीट झाले! या प्रकरणावर कोकण हार्टेड गर्ल म्हणाली…
अंकिता वालावलकर दोन दिवसांपूर्वीच सूरज चव्हाणला भेटण्यासाठी त्याच्या मोढवे गावी गेली होती. यावेळी ‘कोकण हार्टेड गर्ल’ने त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांची भेट घेतली होती. या दोघांची भेट व्हावी याची सूरजचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर होणाऱ्या नवऱ्याला घेऊन लाडक्या भावाच्या घरी अंकिता पोहोचली होती.
अंकिता मोढवे गावी येऊन गेल्यावर या दोघांनी इन्स्टाग्रामवर अनेक फोटो व व्हिडीओ शेअर केले होते. मात्र, सूरजच्या अकाऊंटवरून अंकिता संदर्भातील शेअर करण्यात आलेले फोटो आणि व्हिडीओ काही तासातच डिलीट करण्यात आले आहेत. अंकिताच्या पोस्टवर यासंदर्भात तिच्या काही चाहत्यांनी कमेंट्स करून घडलेल्या प्रकरणाबाबत विचारपूस केली होती. या चाहत्यांना उत्तर देताना अंकिताने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
अंकिताने सूरजच्या वाढदिवशी त्याला शुभेच्छा देण्यासाठी संपर्क साधला होता. मात्र, तिचा फोन वेळेवर कोणीच उचलत नव्हतं. याशिवाय यापूर्वी अंकिताला सूरजच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सुद्धा अनफॉलो करण्यात आलं होतं. यावेळी सूरजला सोशल मीडियाचा वापर करता येत नाही आणि त्याच्या आजूबाजूच्या मंडळींकडून हे करण्यात येत असल्याचं अंकिताने एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं होतं.
आता पुन्हा एकदा ‘कोकण हार्टेड गर्ल’ला असाच काहीसा अनुभव आला आहे. अंकिताच्या पोस्टवर कमेंट्स करत तिच्या चाहत्यांनी सूरजच्या अकाऊंटवरून अंकिताचे फोटो डिलीट झाल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे. “सूरजने १२ तासांच्या आत अंकिताच्या पोस्ट काढून टाकल्यात अकाऊंटवरून?”, “अंकिताचे आधी फोन उचलत नव्हता…आता पोस्ट डिलीट केल्या. त्या जान्हवीने किती शिव्या दिल्या तरी तिच्या पोस्ट आहेत लाज वाटली पाहिजे” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी अंकिताच्या फोटोंवर केल्या होत्या. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ने पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
अंकिताने मांडलं स्पष्ट मत
“याकडे तुम्ही लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद! पण, एक शेवटचं मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. सूरजच अकाऊंट सूरज हँडल करत नाही. सूरजच्या आजूबाजूला त्यांना मी नको आहे याच कारणास्तव मी यातून काढता पाय घेत आहे. यापुढे माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात” असं मत अंकिताने पोस्ट शेअर करत मांडलं आहे.
दरम्यान, अंकिताची पोस्ट सर्वत्र व्हायरल झाल्यावर सूरजने पोस्ट शेअर करत अंकिता व जान्हवी या दोघींच्या पोस्ट काही समस्यांमुळे डिलीट झाल्याचं सांगितलं आहे. तसेच कोणाचेही मन दुखावले असेल तर मी माफी मागतो असंही सूरजच्या टीमने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.