पाच कोटींची रोकड जप्त: प्राप्तीकर विभागाकडे जमा
तपास सुरू
पाच कोटींची रोकड जप्त: प्राप्तीकर विभागाकडे जमा
पुणे, 23 ऑक्टोबर 2024: खेड शिवापूर टोलनाका परिसरात नाकाबंदीत जप्त केलेली पाच कोटी रुपयांची रोकड प्राप्तीकर विभागाकडे जमा करण्यात आली आहे. पोलिसांच्या पंचासमक्ष रोकड मोजण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास आता निवडणूक आयोग आणि प्राप्तीकर विभागाच्या देखरेखीखाली सुरू आहे.
सोमवारी सायंकाळी, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर टोलनाक्यावर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान एका मोटारीतून मोठ्या प्रमाणात रोकड आढळली. मोटार चालकासह चौघांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, त्यानंतर जप्त केलेली रक्कम पंचासमक्ष मोजण्यात आली. मोटार चालकाने दिलेल्या माहितीप्रमाणे, ही रक्कम एका बांधकाम ठेकेदाराची असल्याचे सांगण्यात आले आहे.
तपास सुरू
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेली रोकड पाच कोटी रुपये असल्याचे मोजणीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली असून, प्राप्तीकर विभागाच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
मोटारीतून प्रवास करणारे सागर पाटील, रफीक नदाफ, बाळासाहेब आसबे आणि शशिकांत कोळी यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले असले तरी जप्त केलेली रोकड प्राप्तीकर विभागाकडे जमा करण्यात आली आहे. संबंधित मोटार संदीप नलावडे यांच्या मालकीची होती, परंतु चौकशीत तिची विक्री बाळासाहेब आसबे यांना करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
राजकीय नेत्याशी संबंध?
या प्रकरणाशी एका राजकीय नेत्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीचा संबंध असल्याची चर्चा सुरू आहे.