भीषण अपघातात दोन युवक ठार: अहिल्यानगर-सोलापूर महामार्गावर माहीजळगाव येथे दुर्दैवी घटना

अहिल्यानगर-सोलापूर महामार्गावर माहीजळगाव येथे भीषण अपघातात दोन युवक ठार

नगर: नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील माहीजळगाव बायपासजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा मिरजगाव येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला. मृतांची नावे सोमनाथ दत्तात्रय कदम (वय २४) आणि शिवाजी बबन कदम (वय ३५) असून, हे दोघेही कोकरवाडी तालुका परंडा, जिल्हा धाराशिवचे रहिवासी होते.

घटनानुसार, 22 ऑक्टोबर रोजी, सोमनाथ आणि शिवाजी कदम हे काही कामानिमित्त कोकरवाडीतून करमाळा मार्गे हिरो होंडा स्प्लेंडर (क्रमांक एम एच ४५ आर ९७१८) या दुचाकीवरून मिरजगावच्या दिशेने निघाले होते. नगर-सोलापूर महामार्गावर माहीजळगाव बायपासजवळ, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास, त्यांची अज्ञात वाहनाशी जोरदार धडक झाली. या धडकेत सोमनाथ कदम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर शिवाजी कदम यांचा मिरजगाव येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शिवाजी कदम विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुलांचा परिवार आहे. या दुर्दैवी अपघाताची माहिती मिळताच मिरजगाव येथील जीवन ज्योत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि दोन्ही अपघातग्रस्तांना मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. शिवाजी कदम यांचा श्वास चालू असल्यामुळे त्यांना तत्काळ लोकमान्य हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवाचे शिवछेदन मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले.

अपघाताची फिर्याद मयताच्या नातेवाईक अशोक मधुकर लोखंडे (राहणार मुर्शिदपूर, तालुका आष्टी, जिल्हा बीड) यांनी दिली आहे. कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे आणि मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय कासार या अपघाताचा तपास करत आहेत.

Review