पिंपरीत पर्यटनाच्या नावाखाली घरमालकाचे अपहरण; गंगा नदीच्या बेटावर डांबून एक कोटी रुपयांची खंडणी मागणी

पिंपरी: पर्यटनाच्या बहाण्याने नारळ विक्रेत्यांकडून घरमालकाचे अपहरण; बेटावर डांबून खंडणीची मागणी

पिंपरी: शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन सख्या नारळ पाणी विक्रेत्या भावांनी त्यांच्या साथीदारांसह, पर्यटनाच्या बहाण्याने ५५ वर्षीय घरमालकाचे अपहरण केले. अपहृत व्यक्तीला विमानाने झारखंड येथे नेऊन गंगा नदीच्या बेटावर डांबण्यात आले, आणि त्यांच्या मुलाकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी झारखंड पोलिसांच्या मदतीने अपहृत व्यक्तीची सुखरूप सुटका केली.

विनोदे वस्ती, वाकड येथील पीडिताची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणात नसीम मनीरुल हक अख्तर (२०), लल्लू रुस्तम शेख (४५), आणि साजीम करिम बबलू शेख (२०) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, रेजुल करिम बबलू शेख याच्यासह अन्य तीन आरोपी गंगा नदीत उडी मारून पळून गेले. अपहृत व्यक्तीच्या मुलाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर ही कारवाई सुरू झाली.

पोलीस तपासात असे आढळले की, आरोपी भाडेकरू म्हणून घरमालकाच्या खोल्यांमध्ये राहत होते. त्यांनी पीडिताला पर्यटनाचे आमिष दाखवून विमानाने कोलकाताला नेले. पोलिसांनी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रवाशांची माहिती तपासून आरोपींचा मागोवा घेतला. पोलिसांचे एक पथक झारखंड आणि पश्चिम बंगालला रवाना होऊन अपहरणकर्त्यांचा शोध घेत होता.

खंडणीची रक्कम न दिल्यास वडिलांचा जीव घेण्याची धमकी दिल्यानंतर, पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि गंगा नदीतील बेटावर छापा टाकून पहाटे पाच वाजता पीडिताची सुखरूप सुटका केली.
 

 
 
 
 
 
  
 

 

Review