पुणे: मद्यपी वाहनचालकांवर कठोर कारवाईसाठी दररोज रात्री नाकाबंदी
पुणे: मद्यपी वाहनचालकांवर कठोर कारवाईसाठी दररोज रात्री नाकाबंदी
पुणे शहरात मद्यपी वाहनचालकांना रोखण्यासाठी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी दररोज रात्री नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील 27 ठिकाणे निश्चित केली आहेत आणि या मोहिमेत सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचे नेतृत्व असेल.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही घोषणा केली. नाकाबंदीची वेळ रात्री 11 ते पहाटे 3 पर्यंत असेल आणि शहरातील विविध भागांमध्ये वाहनचालकांची तपासणी केली जाईल. या मोहिमेत सहायक पोलीस आयुक्तांसह 125 पोलीस कर्मचारी सहभागी होतील. कारवाई दरम्यान, वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांचे वाहन जप्त केले जाईल, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.
तपासणी प्रक्रियेत, मद्यपी वाहनचालकांची ब्रेथ ॲनलायझर यंत्राद्वारे तपासणी केली जाईल. स्वच्छता आणि संसर्ग टाळण्यासाठी तपासणीनंतर ब्रेथ ॲनलायझरची नळी तात्काळ नष्ट केली जाईल.
ही मोहीम अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.