राज्याचे शैक्षणिक अस्तित्व धोक्यात? पहिलीपासून हिंदीचा समावेश आणि वेळापत्रक बदलावर शिक्षण क्षेत्राची टीका
 
राज्याचे शैक्षणिक अस्तित्व धोक्यात? पहिलीपासून हिंदीचा समावेश आणि वेळापत्रक बदलावर शिक्षण क्षेत्राची टीका
पुणे, राज्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदीचा समावेश करण्याच्या निर्णयावर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण वाढणार असल्याचा दावा शिक्षकांनी केला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (एससीईआरटी) तयार केलेल्या तिसरी ते बारावीसाठीच्या अभ्यासक्रम आराखड्यात हा निर्णय घेतला असून, सर्व शाळांना ‘सीबीएसई’ पद्धतीचे वार्षिक वेळापत्रक (एप्रिल ते मार्च) लागू करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.
तज्ज्ञांच्या मते, पहिल्याच वर्गापासून हिंदी शिकविणे म्हणजे विद्यार्थ्यांवरील भार वाढवणे आहे. त्याऐवजी त्रिभाषा सूत्रानुसार हिंदीची सुरुवात पाचवीपासून होणे योग्य आहे, असे मत शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केले. शिक्षण संस्था महामंडळाच्या उपाध्यक्ष जागृती धर्माधिकारी यांनीही यावर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, हिंदीचा समावेश करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या आनंददायी शिक्षणावर आणि कौशल्यविकासावर भर दिला जावा.
राज्यातील शैक्षणिक धोरणावर हे बदल राज्याच्या स्वतंत्र अस्तित्वावर प्रभाव टाकू शकतात, असे शिक्षण तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.