निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बदल्या स्थगित
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ४३७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबल्या
निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बदल्या स्थगित
पिंपरी : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ४३७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबल्या आहेत. या बदल्या निवडणुकीनंतर केल्या जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या एप्रिल व मे २०२४ मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, लोकसभा निवडणुका आणि इतर कारणांमुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी 'अ' ते 'ड' संवर्गातील बदल्यांसाठी पात्र कर्मचाऱ्यांची माहिती मागविली होती. यात ४३७ कर्मचाऱ्यांची यादी तयार झाली होती, ज्यामध्ये कार्यकारी अभियंते, उपअभियंते, कनिष्ठ अभियंते, वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लेखापाल यांचा समावेश आहे.
प्रशासनाने सुरुवातीला या बदल्या ऑगस्ट अखेर करण्याचे ठरवले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या बदल्या करण्यात येतील, असे आयुक्तांनी सप्टेंबर महिन्यात जाहीर केले होते. परंतु, प्रत्यक्षात बदल्या न झाल्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सध्या अभय मिळाले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणूक कामासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात बदल्या करणे शक्य नाही, असे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यामुळे आता निवडणुकांनंतरच या बदल्यांचा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.