
डांगे चौकात कचऱ्याचे ढीग; नागरिकांची नाराजी
डांगे चौकात कचऱ्याचे ढीग; नागरिकांची नाराजी
पिंपरी-चिंचवड, १५ ऑक्टोबर २०२४: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत असलेल्या डांगे चौक परिसरात सध्या कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांना आणि व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या या मार्गावर सततची वर्दळ असून, बीआरटी मार्गालगत कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे.
डांगे चौकातील वाकड फाट्याजवळील बीआरटी मार्गाजवळील हा कचरा महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून गोळा करून ठेवला जातो आणि नंतर मोशी कचरा डेपोला नेला जातो. मात्र, वेळोवेळी घंटा गाडी न येत असल्याने अनेकदा कचरा जागेवरच आठ ते दहा दिवस साचलेला राहतो. परिणामी, परिसरात दुर्गंधी पसरते, डासांची संख्या वाढते आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.
व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसत असून, ग्राहकांची संख्या घटत आहे. "महापालिकेने कचरा नियमितपणे उचलण्याची व्यवस्था करावी आणि परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी योग्य पावले उचलावीत," अशी मागणी व्यावसायिक संजय महानवर यांनी केली आहे.
डांगे चौकात कचऱ्याचे ढीग, पुलाखाली उभी असलेली वाहने, मद्यपी आणि जुगाऱ्यांचे अड्डे यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. परिसराचे स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेने तात्काळ उपाययोजना करावी, अशी विनंती येथील नागरिकांनी केली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त अजिंक्य येळे यांनी कचरा उचलण्याचे काम नियमितपणे करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले असून, नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये असे आवाहन केले आहे.