पिंपरी: प्रशासकीय राजवटीतही विकासकामांना वेग
दसऱ्यादिवशीही स्थायी समितीची बैठक
पिंपरी: प्रशासकीय राजवटीतही विकासकामांना वेग
दसऱ्यादिवशीही स्थायी समितीची बैठक
पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय राजवटीच्या काळातही विकासकामांचा वेग कायम आहे. गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीत तीन हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मान्यता देण्यात आली आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासक म्हणून मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतले असून, प्रशासकीय राजवटीच्या मर्यादांना न जुमानता त्यांनी विकासकामांना सुसाट वेग दिला आहे.
ओबीसी आरक्षण, प्रभाग रचनेचा तिढा आणि राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे महापालिकेच्या निवडणुका वारंवार लांबणीवर पडल्या आहेत. १२ मार्च २०२२ रोजी महापालिकेतील लोकनियुक्त नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासनाने विकासकामांचे नेतृत्व केले आहे. शेखर सिंह यांच्या नेतृत्वात पिंपरी, चिंचवड, आणि भोसरी मतदारसंघांमध्ये विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे दसऱ्याच्या दिवशीही स्थायी समितीची बैठक घेऊन तब्बल ५०० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. आचारसंहिता लागू होण्याच्या भीतीने सात दिवसांत तीनवेळा स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली, ज्यामुळे महापालिकेत ठेकेदार आणि नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली.
महापालिकेतील विकासकामांच्या यादीत नदी सुधारणा, रुग्णालये, मेट्रो प्रकल्प, अग्निशमन मुख्यालय, स्वच्छतागृहांचे सुधारणा यांसारखे विविध प्रकल्प समाविष्ट आहेत.