पिंपरी-चिंचवड: रोड रोमिओंच्या त्रासाने १२ वर्षीय मुलीने घेतली आत्महत्या; वडिलांनी तपास करून आरोपींना दिला रंगेहात
पिंपरी-चिंचवड: रोड रोमिओंच्या त्रासामुळे १२ वर्षीय मुलीची आत्महत्या; वडिलांनी तपास करून आरोपींना अटक
पिंपरी-चिंचवड, 7 ऑक्टोबर 2024: भोसरीमध्ये पाच महिन्यांपूर्वी अवघ्या १२ वर्षीय मुलीने रोड रोमिओंच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी स्वतः तपास करून आरोपींचा शोध लावला आणि त्यानंतर भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मुलीने ६ जून २०२४ रोजी आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केली, ज्यामुळे तिचे कुटुंब दु:खात लोटले गेले. तिचे वडील चहा विक्रीचा व्यवसाय करतात आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. आत्महत्येमागील कारण समजून घेण्यासाठी वडिलांनी नैराश्यात न जाता स्वतः तपास सुरू केला.
त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि परिसरातील लोकांशी चौकशी केली. या प्रक्रियेत मुलीच्या खिशात आरोपींचा मोबाईल नंबर सापडल्याने यावरून स्पष्ट झाले की, आरोपी तिचा पाठलाग करत होते आणि तिला त्रास देत होते. यावरून वडिलांनी भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार केली.
पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. आरोपींची नावं क्षितिज लक्ष्मण पराड (वय २०) आणि तेजस पांडुरंग पठारे (वय १९) आहेत. मात्र, आत्महत्या झालेल्या मुलीच्या बाबतीत पोलिसांनी योग्य कारवाई का केली नाही, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील सुरक्षा व्यवस्था कमी पडत आहे. महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी कठोर पाऊले उचलण्याची गरज असल्याचे पालकांचे मत आहे.