८ वर्षांनी पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा बॉलीवूडमध्ये कमबॅक, ‘अबीर गुलाल’ चित्रपटाची घोषणा
८ वर्षांनी फवाद खानचा बॉलीवूडमध्ये कमबॅक, ‘अबीर गुलाल’ सिनेमासाठी वाणी कपूरसोबत काम सुरू
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. २०१६ साली आलेल्या करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात फवाद शेवटचा दिसला होता. त्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यानच्या राजकीय तणावामुळे पाकिस्तानी कलाकारांवर अनौपचारिक बंदी घालण्यात आली होती, ज्यामुळे फवाद यांना बॉलीवूडपासून दूर राहावं लागलं. मात्र, आता आठ वर्षांनंतर फवाद खान पुन्हा बॉलीवूडमध्ये काम करत आहे.
फवाद खान आणि वाणी कपूर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. त्यांनी ‘अबीर गुलाल’ नावाच्या रोमँटिक कॉमेडी सिनेमाचं शूटिंग लंडनमध्ये सुरू केलं आहे. सोमवारी या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली आणि पहिला लूकदेखील प्रदर्शित करण्यात आला. या लूकमध्ये फवाद आणि वाणी हिरवळीवर एकमेकांच्या जवळ पहुडलेले दिसतात, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
लंडनमध्ये सुरू झालं शूटिंग ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट आरती एस. बगदी दिग्दर्शित करत आहेत. त्यांनी याआधी ‘चलती रहे जिंदगी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या नव्या सिनेमाची निर्मिती इंडियन स्टोरीज, ‘अ रिचर लेन्स’ आणि ‘आरजे पिक्चर्स’ यांनी केली आहे. चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत यूकेमध्ये पार पाडणार आहे.
फवाद-वाणीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चित्रपटातील फवाद आणि वाणीची जोडी प्रेक्षकांना आकर्षित करणार असल्याची निर्मात्यांना खात्री आहे. फवाद खानचा जागतिक स्तरावर प्रचंड चाहता वर्ग आहे, आणि वाणी कपूरने तिच्या पूर्वीच्या चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. निर्मात्यांनी सांगितलं की, "फवाद आणि वाणी यांच्या अभिनयामुळे चित्रपटात जादू निर्माण होईल."
८ वर्षांनंतर फवाद खानचं पुनरागमन फवाद खानने याआधी ‘खूबसूरत’ आणि ‘कपूर अँड सन्स’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचं बॉलीवूडमधील पुनरागमन प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे. दुसरीकडे, वाणी कपूरने तिच्या ‘चंदीगड करे आशिकी’ या चित्रपटात ट्रान्सजेंडर व्यक्तिरेखेसाठी वाहवा मिळवली होती. ती लवकरच नेटफ्लिक्सच्या ‘मंडाला मर्डर्स’ या क्राईम थ्रिलर सीरिजमध्येही दिसणार आहे.
फवाद खान आणि ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ वाद मध्यंतरी फवाद खानच्या ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ चित्रपटाच्या भारतातील प्रदर्शनावर वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. परंतु, या नव्या सिनेमामुळे फवाद खान पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये चर्चेत आला आहे.