पिंपरी-चिंचवडमध्ये संविधान भवन उभारण्यासाठी 120 कोटी रुपयांची निविदा जाहीर

पिंपरी, 7 ऑक्टोबर 2024: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने देशातील पहिले संविधान भवन उभारण्यासाठी 120 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेची घोषणा केली आहे. भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या संविधानाच्या प्रचार आणि जनजागृतीसाठी उभारण्यात येणारे हे संविधान भवन, भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पुढे आले आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी गती दिली आहे.

संविधान भवन व विपश्यना केंद्र पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या पेठ क्रमांक 11 मध्ये उभारले जाणार आहे. पीएमआरडीएने संबंधित जागा महानगरपालिकेकडे हस्तांतरित केल्यानंतर, महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात 2.53 कोटींच्या आणि दुसऱ्या टप्प्यात 117 कोटींच्या निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत.

महेश लांडगे यांचे मत:
"संविधान भवनाच्या उभारणीसाठी 2019 पासून प्रयत्न सुरू होते. मात्र, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात प्रकल्प लांबणीवर पडला होता. महायुतीच्या सत्ताकाळात 2022 मध्ये प्रकल्पाला गती मिळाली आणि आता निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे," असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. संविधान भवन शहरात उभारले जाणे पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संविधान भवनामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी तसेच संविधान जागृतीसाठी विशेष उपक्रम राबवले जातील, ज्यामुळे लोकशाहीच्या अभ्यासाला चालना मिळेल.

Review