चिंचवड विधानसभा: अजित पवारांच्या गटात बंडखोरी
भाऊसाहेब भोईर अपक्ष लढण्यावर ठाम
चिंचवड विधानसभा: अजित पवारांच्या गटात बंडखोरी, भाऊसाहेब भोईर अपक्ष लढण्यावर ठाम
चिंचवड शहर, जे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते, तिथे आता राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पाच वेळा नगरसेवक राहिलेल्या आणि अजित पवारांचे विश्वासू मानले जाणारे भाऊसाहेब भोईर यांनी बंड करत आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्धार केला आहे.
भाऊसाहेब भोईर यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये मेळावा घेत आपल्या अपक्ष लढण्याच्या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी आपल्या भाषणात अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला, "अजित पवारांनी सरड्याचे डायनासोर केले आहेत," अशी टीका केली. याचबरोबर त्यांनी इशारा दिला की, "माझ्यावर कुठल्याही पातळीवर टीका केल्यास त्या व्यक्तीला सोडणार नाही. माझ्याकडे अनेक जणांच्या कुंडल्या आहेत." यामुळे त्यांनी पक्षातील नेत्यांवरही ताशेरे ओढले आहेत.
भोईर हे २००९ मध्ये विधानसभा आणि २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढले होते. मात्र, त्यांना त्या निवडणुकांमध्ये अजित पवार आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला, असे त्यांचे म्हणणे आहे. आगामी निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे चिंचवडमध्ये मोठा राजकीय रणसंग्राम होण्याची शक्यता आहे.
भोईर यांचा हा निर्णय अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.